कविता – माती बोलते आहे...
माती बोलते आहे...
तिच्या स्वरांत अजूनही थरथर दाटलेली —
घामाच्या थेंबांनी भिजलेला इतिहास,
आजही तिच्या श्वासात सळसळतोय.
ती कुजबुजते —
“मी पाहिलीत स्वराज्याची स्वप्नं,
पेरलं बियाणं स्वाभिमानाचं,
पण माझ्याच छातीवर आता
विटांची जखम उमललीय...”
“माझ्या कुशीत विसावलेली स्वप्नं,
आज सिमेंटच्या पिंजर्यात श्वास घेताहेत,
तरी माझ्या भेगांतून अजूनही
हिरवा अंकुर डोकावतोय.”
माती पुन्हा सांगते —
“माझा गंध अजूनही ताजाच,
फक्त तू त्याला ओळख,
मन लावून ऐक...
मी हरले तर
तू कसा जिंकशील?
माझ्याविना तुझ्या अस्तित्वालाही
ओळख उरणार नाही!”
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १०/११/२०२५ वेळ : ०८:२८
Post a Comment