कविता – जेमी — तळपणारी विज


कविता – जेमी — तळपणारी विज

ती —
मुंबईच्या गल्ल्यांमध्ये
उन्हात खेळलेली लहानशी मुलगी...
हातात चेंडू, हृदयात स्वप्न...
लख्ख उन्हातही तळपणारी वीज,
आणि नजरेत कोरलेला एकच शब्द —
“भारत!” 🇮🇳

ती जेव्हा बॅट उचलते —
तेव्हा तो केवळ फटका नसतो...
तो असतो आत्मविश्वासाचा आवाज —
“मीसुद्धा करू शकते!”

तिचं नाव — जेमिमा,
पण चाहत्यांच्या मनात ती फक्त “जेमी”,
जणू मैदानावर सळसळणारी सूरमयी लय,
जिथे प्रत्येक धाव म्हणजे...
एखाद्या कवितेची ओळ.

ती फटकावते चौकार —
जणू वाऱ्याच्या वेगाने!
ती धावते —
जणू सूर्यापेक्षा पुढेच तिचं ध्येय आहे! 

कधी बेंगळुरूचा पाऊस, 
कधी लंडनचा गारवा,
तर कधी सिडनीच्या उन्हात —
ती नेहमी उजळवते आकाश
भारताच्या निळ्या रंगात.

तिच्या बॅटचा आवाज म्हणजे
एका नव्या युगाचा नाद —
जो सांगतो...
“स्त्रिया आता फक्त खेळ पाहत नाहीत...
त्या खेळ बदलतात!”

आणि जेव्हा ती हसते —
तेव्हा स्टेडियमचं आकाशही थरथरतं...
कारण त्या हसण्यात दडलेले असतात
एका देशाच्या अभिमानाचे अश्रू. 

जेमी,
तू फक्त खेळाडू नाहीस,
तू आहेस प्रेरणेचं नाव...
तू आहेस चौकारांत उमललेली कविता,
आणि भारताच्या हृदयात उमटलेला जयघोष —
“चल जेमी... मार आणखी एक फटका!”

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०१/११/२०२५ वेळ : ०५:४९

Post a Comment

Previous Post Next Post