कविता – हरवणं
कधीतरी आपणच कोणाचं संपूर्ण जग बनतो,
त्यांच्या श्वासांच्या लयीत आपला आयुष्य हरवतो...
पण एक दिवस येतो —
जेव्हा आपली उपस्थिती फक्त वाऱ्यासारखी उरते,
तिचं मोल कुणालाच जाणवत नाही.
ते हसतात,
जणू आपल्या अनुपस्थितीतही त्यांचं सुख शोधतात,
आणि आपण —
निशब्द शांततेत
स्वतःचं अस्तित्व गमावून बसतो.
नाती तुटत नाहीत
फक्त भावनांचे धागे सैल होतात,
एकाच्या बेफिकिरीसमोर
दुसऱ्याला गमावण्याची भीती सतावते.
कधी वाटतं —
जपावं, समजावं, थांबवावं,
पण मनाच्या काचा—
एका कटाक्षातच तडकतात.
धुक्यात हरवलेल्या श्वासासारखं
नातं हळूहळू विरतं,
आणि जेव्हा तो माणूस
खरोखर दूर निघून जातो,
तेव्हाच उमगतं —
आपण त्याचं प्रेम नव्हतं गमावलं,
तर आपण त्याचं “असणं” हरवलं.
नाती टिकवण्यासाठी शब्द नव्हे,
तर जाणिवा जपाव्या लागतात;
आणि त्या जेव्हा मरतात,
तेव्हा जिवंत राहतात फक्त आठवणी —
धूसर, तरीही चिरंतन,
जशा संध्याकाळच्या रंगांसारख्या —
मऊ, विरघळणाऱ्या,
पण अंतरी कायम राहणाऱ्या.
कधी कधी,
एखादं नातं संपत नाही,
ते फक्त मौन होतं —
आणि त्या मौनात आपण
आपलं “हरवणं” शोधत राहतो...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २६/१०/२०२५ वेळ : १७:१९
Post a Comment