कविता – शिवसेवेचे व्रत – आनंद दिघे


कविता – शिवसेवेचे व्रत – आनंद दिघे

ज्येष्ठांच्या मूक आशीर्वादातून,
तरुणांच्या उमेदीच्या झंकारातून
जन्माला आलेले ते व्यक्तिमत्त्व –
आनंद दिघे!

नावात होता आनंद,
डोळ्यांत पेटलेला लाव्हा;
पण जनतेच्या हृदयात त्यांनी रुजवला
विश्वासाचा वटवृक्ष —
छायेसारखा आधार देणारा,
मुळाशी स्थिर उभा राहणारा.

ठाण्याच्या गल्लीबोळांतून
घुमणारा त्यांचा आवाज म्हणजे 
सिंहगर्जनाच —
“न्याय मिळालाच पाहिजे!”
असं जणू वीज कोसळल्यागत
ते ठामपणे सांगत.

साधा वेश, पण कार्य थोर,
सत्तेच्या मोहापासून अलिप्त,
पण जनतेच्या वेदनांत पूर्ण गुंतलेले…
ते झाले सामान्यांचा खंबीर आधार.

कारखानदारांची दादागिरी रोखणारा 
कठोर हात,
वृद्धांच्या डोळ्यांतील पाण्यास
बांध लावणारी करुणा,
भटक्या मुलांच्या पोटात 
भाकर भरवणारी आईची माया…
असे ते साक्षात समाजधनी.

नेते म्हणून नव्हे,
तर कुटुंबप्रमुख म्हणून
जनतेच्या मनात वसलेले ते…
निष्ठा म्हणजे काय,
कार्यकर्तृत्व म्हणजे काय
हे त्यांनी स्वतः करून दाखवलं.

आंदोलनात रात्रभर ठाण मांडून बसणारे,
गरजूंसाठी स्वतःच्या खांद्यावर
धान्याची पोती उचलणारे…
हे जिवंत प्रसंग आजही
जनतेच्या आठवणीत धडधडतात.

आजही ठाण्याच्या आभाळात
त्यांच्या स्मृतींचा गडगडाट घुमतो;
आजही रस्त्यावर अन्याय झाला,
की मनात उमटतो एकच प्रश्न —
"दिघेसाहेब असते तर…?"

त्यांची धडाडी, साधेपणा,
आणि जनमाणसांवरील प्रेमळ पकड
हेच खरे प्रेरणास्थान.

ते गेले तरी विचारांचा दिगंत
आजही आपल्याला सांगतो —
"जनतेची सेवा म्हणजेच खरी शिवसेवा!
हेच शिवसेवेचे व्रत,
आणि तेच दिघेसाहेबांचं खरं स्मरण."

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २६/०८/२०२१ वेळ : २३:३१

Post a Comment

Previous Post Next Post