कविता – “बाबा, तू कधी येणार…?”


कविता – “बाबा, तू कधी येणार…?” 

बाबा,
आपल्या घरी गणपती बाप्पा आलाय,
आरास झगमगतेय, 
दिव्यांचा प्रकाश घरभर पसरतोय,
मोदकांचा गोड सुवास घरभर दरवळतोय,
त्यात ताज्या फुलांचा सुगंधही मिसळलाय,
पण माझं मन विचारतंय —
“बाबा, तू कधी येणार…?”

आरतीच्या ज्योतीत
मी तुझ्या डोळ्यांमधली ऊब शोधते,
सजावटीवर हात फिरवताना
मला तुझा हसरा चेहरा सापडतो,
ढोल-ताशांच्या गजरात
तुझ्या पावलांचा मागोवा घेत हृदय धडधडतं।

बाप्पा त्याच्या मुकुटावरील चंद्रकोरीतून
जणू तुझा आशीर्वाद पाठवतो,
अन् मोदक हातात धरताना
मी तुझ्या प्रेमाची गोडी अनुभवते।

बाप्पा आला, घर मंगलमय झालंय,
पण तुझ्याशिवाय हा उत्सव अपूर्ण आहे।

ये ना लवकर,
गणरायाला साक्षी ठेवून
आपल्या मनातील रिकामेपण भरूया,
आरतीत एकत्र रंगून
पुन्हा एकरूप होऊन गाऊया।

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २८/०८/२०२५ वेळ : ०६:१२

Post a Comment

Previous Post Next Post