गीत – वाचन संस्कृती जपूया…


ागपूर पुस्तक महोत्सव – थीम गीत

 

शीर्षक: वाचन संस्कृती जपूया…

 

वाचन संस्कृती जपूया, जगास प्रेरणा देऊया,

वाचन दीप पेटवूनी, आपला देश उजळूया।

 

पुस्तकांच्या कुशीत वाहे, ज्ञानदीपाचा अखंड झरा,

शब्दफुलांच्या गंधातून, लाभे अर्थ जगण्या खरा।

 

वाचन संस्कार अमोल, मना देतो नवा गारवा,

शब्दविश्वात रमताना, स्वप्नांचा सजतो मेळावा।

 

इतिहासाच्या पानोपानी, सामर्थ्याचे अमर ठसे,

साहित्याच्या सुरेल ओळी, मानवतेचे स्वर जसे।

 

ग्रंथांच्या माळेत गुंफुनी, संस्कृतीचे मोती राहती,

ज्ञानवृक्षाच्या सावलीत, भविष्य वाटा उजळती।

 

शोधांच्या ज्योतींनी फुलते, भविष्याची सुवर्ण वाट,

वाचन संस्कृती जपते, उज्ज्वल चेतनेचा थाट।

 

बालमनास कुतूहल, युवांच्या उमेदीचा रंग,

वाचनातून जग जोडू, राष्ट्राचे होऊ सशक्त अंग।

 

चला चाळूया, चला वाचूया, ग्रंथोत्सव हा साजरा करूया,

वाचन दीप पेटवूनी, आपला देश उजळूया।

 

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

दिनांक : ३१/०८/२०२५ वेळ : ०४:०५

Post a Comment

Previous Post Next Post