कविता - क्षणांचं हस्ताक्षर
क्षणाचं बोट धरून
आपण चालत राहतो —
कधी आशेच्या उजेडात,
कधी विस्मृतीच्या धुक्यात...
पावलोपावली हरवतो,
आणि पुन्हा सापडतो स्वतःलाच.
कधी दिवस धावतो,
कधी आपण मागे पडतो;
कधी एखादा शब्द,
कधी एखादी नजर
मनाला ओलावून जाते.
विचारांचं ओझं
शब्दांपर्यंत पोहोचण्याआधीच
मौनात विरतं —
शब्दांवरची पकड सुटते,
आणि हृदय
निव्वळ धडधडत राहतं...
गौरवाचं चांदणं
क्षणभर डोळ्यांत ठसतं,
मग अंधाराशी एकरूप होतं.
तेव्हाच जाणवतं —
आपण काळाच्या कडेलोटावर
एक क्षणभंगुर प्रकाशरेषा आहोत,
ज्यांचं अस्तित्व जळण्यातूनच उमगणारं आहे.
जे हरवलं, ते संपू नये;
जे आहे, त्याचं भान सुटू नये;
हातातून निसटणं म्हणजे
अस्तित्व हरवणं नसतं —
तर नव्यानं उलगडणं असतं.
आजचा एक क्षण
उरभरून जगा —
जणू हीच अंतिम ओळ असेल
तुमच्या जीवनाच्या खेळात...
...कारण हेच क्षणांचं हस्ताक्षर
आपल्याला विचारतं —
"तू जगतो आहेस की फक्त श्वास घेतो आहेस?"
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०७/०५/२०२५ वेळ : ०७:५१
Post a Comment