कविता - हार्टबीट्स
हृदयाच्या पिंजऱ्यात
सावधपणे वाजणारे ते ठोके –
कधी लयीत, कधी उसंत घेणारे...
जणू जीवनाचं एक अनाहत संगीत!
एक ठोका –
आईच्या उदरातील श्वासांचा नाद,
दुसरा –
बाबांच्या सुरक्षेतला निश्चिंत आधार,
तिसरा –
पहिलं प्रेम… नजरेतून मनात उतरलेलं,
चवथा –
विरहात दाटलेलं आभाळ…
प्रत्येक हार्टबीट
जणू एक कथा सांगते –
अधुरी, अपूर्ण, विसरलेली,
पण काळजात अजरामर झालेली.
तुटलेलं पण गूढ,
व्यथित तरीही मधुर,
जसं पौर्णिमेच्या आकाशात
विरघळलेली चांदणी...
हा धडधडता ठोका
फक्त जिवंतपणाचा दाखला नाही,
तो आहे…
स्मरणांचा, आशेचा, आणि
कधी ना कधी येणाऱ्या
शेवटच्या श्वासातील शांतीचाही…
"मी जिवंत आहे…
कारण तू अजूनही
प्रेम करतेस, आठवतेस,
आणि अजूनही जपतेस…"
हेच सांगतात
माझ्या आत उमटणारे
हार्टबीट्स...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २५/०४/२०२५ वेळ : १४:५३
Post a Comment