लघुकथा - नफा!?
महिलेने दुकानदाराला विचारले, 'हा हार कितीचा आहे?' महिलेच्या डोळ्यातील चमक सांगत होती की ती हा हार घेऊनच जाणार आहे. दुकानदाराने ही चमक वाचली होती. त्याने हार महिलेच्या पुढ्यात ठेवत सांगितले, 'तीनशे रुपये!'
महिलेने हार हातात घेतला आणि त्याची काळजीपूर्वक तपासणी करू लागली. गळ्याभोवती हार धरून आरशात मोहक नजरेने पाहिले. ती मनात म्हणाली, 'हा तोच हार आहे जो मी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन साईटवर पाहिला होता. तिथे त्याची किंमत ७०० रुपये होती आणि इथे फक्त ३०० रुपयांना म्हणजे निम्म्याहून कमी किमतीत. मला एकूण ४०० रुपये नफा होत आहे. क्षणात तिने, 'भाऊ, हा हार बांधा.' असे म्हणत पर्समधून तीनशे रुपये काढून दुकानदारासमोरील काउंटरवर ठेवले.
दुकानदाराने मनात विचार केला, 'मी हा हार दोनशे रुपयांना देऊ शकलो असतो, पण या बाईने घासाघीसच केली नाही. जाऊ दे आपल्याला काय? आज फक्त एका हारावर १०० रुपये नफा आहे. तोही जास्तिचा."
© गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १६/०२/२०२५ वेळ ११:०२
Post a Comment