कविता - आयुष्याचा खरा अर्थ

 


मला जन्म देणारी तूच 

मला हे जग दाखवणारी तूच

माझ्यासाठी रात्रभर जागणारी तूच

अन् मला मांडीवर झोपवणारी तूच


झोप यावी म्हणून अंगाई गाणारी तूच

पदराचा आडोसा करणारी तूच

कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून  

काळा टिळा लावणारीही तूच


माझं बोट धरून चालवणारी तूच

मला दुखापत झाली तरी रडणारी तू्च 

उन्हात पदराची सावली करणारी तूच

अन् थंडीत मायेची उब देणारी तूच


माझ्यासाठी स्वप्ने बघणारी तूच

माझ्या खोड्यांवर हसणारी तूच 

माझ्या चुका पदरात घेणारी तूच

माझी तलवार अन् ढालही तूच


बाबांच्या मारापासून वाचवणारी तूच 

माझ्यासाठी जगाशी भांडणारी तूच

माझ्या यशावर आनंदी होणारी तूच

माझे आयुष्य उजळून टाकणारी तूच


असा कोणताच क्षण नाही ज्यात तू नाही आई 

माझ्या दिवसाची सुरूवात अन् शेवट तू आई

तू माझे सर्वस्व अन् माझे जग आहेस तू आई

माझ्या आयुष्याचा खरा अर्थ आहेस तू आई


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

दिनांक : १२/०५/२०२४ वेळ : ०७०२

Post a Comment

Previous Post Next Post