लेख - आत्मसंयम असणे हे महान व्यक्तीचे पहिले लक्षण!

आत्मसंयम ही माणसाची अशी आंतरिक क्षमता आहे, ज्याच्या आधारे माणूस आपला सर्वांगीण विकास करू शकतो. वाईट सवयींवर नियंत्रण ठेवणे केवळ आत्मसंयमाच्या सामर्थ्याने शक्य आहे. खरंतर वाईट सवयी आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळे बनतात. प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मसंयम यामध्ये योग्य संतुलन साधले तर अशक्य उद्दिष्टही सहज गाठता येते. संयम हा असा बीज मंत्र किंवा आवरण आहे, जो प्रत्येक परिस्थितीत प्रभावी आहे. या जगात राहिलेल्या सर्व महापुरुषांचे जीवन हाच संदेश देते की, त्यांच्या प्रगतीत आत्मसंयमाने महत्त्वाची भूमिका बजावली. आत्मसंयम असणे हे महान व्यक्तीचे पहिले लक्षण आहे. ज्या लोकांचे स्वतःवर आत्मनियंत्रण असते त्यांचे आरोग्य, नातेसंबंध, आर्थिक स्थिती आणि करिअर इतरांपेक्षा चांगले असते. असे लोक जीवनात अधिक समाधानी राहतात. त्यांना जीवन अधिक अर्थपूर्ण वाटते. आत्मनियंत्रणामुळे जीवन सर्जनशीलतेने भरलेले आहे. हा सदगुण वासना, क्रोध, लोभ, आसक्ती आणि भय काढून टाकतो तसेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला गहनता आणि गांभीर्य प्रदान करून त्याचे जीवन आनंदी बनवतो. आत्मसंयमाचा महान मंत्र आत्मसात करून आपण अमर्याद इच्छांच्या घोड्याचा लगाम आपल्या हातात ठेवू शकतो. थोडं खोलात जाऊन पाहिलं तर शिस्तप्रिय माणसाचा प्रवास कणापासून शंकरापर्यंतचा आहे. आपल्याला आपल्या जीवनात आत्मसंयमाची गरज आहे, जेणेकरून आपण निश्चित केलेल्या मार्गापासून दूर न जाता आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होऊ शकू.


©गुरुदत्त रोहिणी दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक :२०/३/२०२४ वेळ ०३०६

Post a Comment

Previous Post Next Post