लघुकथा
सुवर्णक्षण
१०.९.२०२३
मुखवटा
भारतीय पुरोगामी महिला समितीच्या वार्षिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. महिलांच्या केंद्रीय समितीने चर्चेअंती सर्वानुमते हा निर्णय घेतला की, पत्रकार संघाच्या अध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले पाहिजे, कारण गेल्या दशकभरापासून ते आपल्या वर्तमानपत्रांमधून महिलांच्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने प्रश्न मांडत आहेत आणि स्त्रीमुक्तीचा नारा देत आहेत. परिषद सुरू झाली. अध्यक्ष आले आणि व्यासपीठावरून म्हणाले, "सध्याच्या मध्यमवर्गीय समाजात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वर्तमानपत्राचे मथळे बनले आहेत. शेवटी त्यांनी पुरुषांना इशारा दिला आणि म्हणाले, "जर हे वेळीच थांबले नाहीत तर नजीकच्या भविष्यात स्त्रियांना पुरुषांविरुद्ध बंड करण्यास भाग पाडले जाईल." टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे भाषण संपले आणि कार्यक्रम संपला. ते त्यांच्या गाडीत बसले आणि घरी आले. घरातील नोकराने सांगितले की, त्यांची पत्नी बाहेर गेली असून अद्याप परतली नाही. अध्यक्षांच्या चेहऱ्यावर संतापाच्या खुणा उमटल्या. तेवढ्यात त्यांची पत्नी घरी परतली. ते ओरडत म्हणाले, "मी तुला कितीवेळा सांगितले आहे की, मी घरी आल्यावर तू घरी हजर राहणे फार महत्वाचे आहे, पण तू काही केल्या ऐकत नाहीस." ते रागाच्या भरात अजून काही बोलणार इतक्यात त्यांच्या पत्नीने त्यांना हाताने खुण करून गप्प राहण्याचा इशारा केला आणि म्हणाली, "तुम्ही ज्या महिला सभेत भाषण करून आला आहात, त्याच सभागृहात मी तुमचे भाषण ऐकत होते. तुम्हांला काय वाटते? तुम्ही माझ्यासोबत कसे वागता ते मी तुमच्या पत्रकारांना बोलावून सविस्तर सांगू का?"
आता मात्र अध्यक्ष भांबावून इकडे तिकडे बघू लागले. ते नरमाईच्या स्वरात म्हणाले की, "अगं, गोष्ट अशी आहे की मी तुझ्यावर इतके प्रेम करतो की तू घरी नसताना अस्वस्थ होतो." त्यांना थांबवत पत्नी म्हणाली, "मला चांगलं समजतंय," आणि उपहासाने हसली.
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : १०/०९/२०२३ वेळ : ०४:३८
Post a Comment