स्मृतिकाव्य
सुवर्णक्षण
३.८.२०२३
नामदेव धोंडो महानोर
(१६ सप्टेंबर १९४२ - ३ ऑगस्ट २०२३)
निसर्गांची भाषा जणू
नामदेवा उमजली
साहित्याच्या जगतात
नाममुद्रा उमटली
रानातल्या कवितेचा
स्पर्श मनास लाभला
निसर्गाच्या सानिध्यात
रात्रंदिन हरपला
गावातल्या गोष्टीमध्ये
पळसखेडची गाणी
शब्द शब्द मौल्यवान
जणू अमृताची वाणी
पावसाळी कवितांशी
नाळ जोडणारी वही
काळ्या तांबड्या मातीचा
दुजा मृदगंध नाही
नाते सांगे जीवनाशी
काव्यसृष्टी प्रतिमांची
बहरली शब्दकळा
रांग लागे प्रतिकांची
लळा लावला शेताने
जीव असा जखडला
रानोमाळी रूजताना
शब्द हिरवा जाहला
दिवेलागणीच्या वेळी
कसा तिमीर दाटला
मना चटका लावून
निसर्गात सामावला
गंगा वाहू दे निर्मळ
सांगे माझा रानकवी
लेखणीच्या हातातून
कसा निसटला रवी
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : ०३/०८/२०२३ वेळ : ०५:०९
Post a Comment