कविता – “मला कुठे काय जमतं, पिल्ला…”


कविता – “मला कुठे काय जमतं, पिल्ला…”

मला कुठे काय जमतं, पिल्ला…
मी तर फक्त तुझ्या चिमुकल्या हातात
विश्वासाचा एक छोटासा किरण ठेवला होता;
आणि तू—
त्या किराणा पासूनच
तुझं संपूर्ण आकाश उजळवून घेतलंस.

मी जे काही करतो,
त्यात कसली विशेष कौशल्यं असतात गं?
खरंतर—
तुला घाबरवणाऱ्या सावल्या
माझ्यापर्यंतच थांबाव्यात,
आणि तुझ्याजवळ पोहोचण्याआधीच
धूळीत विसर्जित व्हाव्यात—
यासाठी मी केलेला
निःशब्द, अदृश्य पहारा असतो.

तू “बाबा…” म्हणतेस त्या एका स्वरातच
माझ्या खांद्यांत पर्वताचं बळ उतरून येतं;
मनात उसळणारं धैर्य
तुझ्या छोट्या डोळ्यांत
सुरक्षेचा तेजस्वी दीप होऊन पेटतं.

तुला बरं नसतं तेव्हा—
रात्रभर तुझ्या शेजारी बसून,
तुझ्या स्वप्नांचे गुज हलकेच थोपटत
मी पहाटेपर्यंत जागा असतो.
यात काय माझं कौशल्य, बाळा?
हे तर प्रत्येक वडिलांना लाभलेलं
जन्मजात, निर्विवाद—
हृदयाचं अतूट ऋण असतं.

तुझं एकच हसू
माझ्या थकलेल्या मनावर
मोरपंखी झुळूक बनून फिरतं;
आणि तुझा एकच अश्रू—
माझ्या उरातल्या
अनंत सूर्यांची सारी उष्णता
नेत्रांत ओघळवत आणतो.

जग म्हणतं—
बाप खंबीर असतो.
पण खरं सांगू का, परी—
तो रोज वितळतो, रोज तुटतो;
तरी तुझ्या कोवळ्या आकाशाच्या
क्षितिजाआड दडलेल्या स्वप्नांसाठी
आपलं विश्व पुन्हा—पुन्हा जोडत राहतो.
आणि ही सारी जुळवाजुळव
तुझ्या विश्वासापासून
कुशलतेने लपवत राहतो.

मला खरंच कुठे काय जमतं, पिल्ला…
मी तर एक साधी सावली—
तुझ्या पावलांसोबत निष्ठेने
तप्त उन्हातही चालणारी;
तुझ्या भीतींची वादळं
माझ्याकडे वळवून घेणारी;
आणि तुझ्या उजेडासाठी
स्वतःची रात्र
शांतपणे अर्पण करणारी.

तू एखाद्या संध्याकाळी
माझा हात हळूच धरून विचारतेस—
“सांग ना रे बाबा… तुला इतकं कसं जमतं?”
आणि माझं उत्तर आजही तेच—
माझ्या अस्तित्वाचं सार
तुझ्या एका “बाबा”मध्येच
पूर्णपणे सामावलेलं आहे, पिल्ला…

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : १५/११/२०२५ वेळ : १५:३०

Post a Comment

Previous Post Next Post