कविता - स्त्रिया...
काही स्त्रिया
श्वास घेत राहतात रोज,
त्या चार भिंतींच्या आत,
जिथे खिडक्या असतात,
पण प्रकाशाचा एकही किरण
कधीच पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत...
काही स्त्रिया
फुलवत राहतात स्वप्नं,
गरम भाकरीसारखी,
त्यांना ठाऊक असतं —
भाकरी भाजली जाईल,
पण स्वप्नं मात्र विरघळतील,
डोळ्यांतल्या अश्रूंच्या मिठासह,
मनाच्या अंतस्तलात...
काही स्त्रिया
रगडतात कपडे,
जणू त्या कपड्यांच्या घडीघडीतून,
धुवून टाकतात मनातल्या जखमा, राग...
पण त्यातून गळतात,
फक्त पाण्याचे थेंब,
जे त्यांच्या गालांवरून ओघळतात...
काही स्त्रिया
नटतात रंगीबेरंगी साड्यांमध्ये,
लावतात कुंकू,
घालतात रंगबिरंगी बांगड्या,
करतात हरएक साजशृंगार,
जगाला दाखविण्यासाठी,
पण हरवून बसतात स्वतःला,
हरवून बसतात स्वतःला,
आठवणींच्या अंधुक सावलीत,
मनाच्या अनाहूत इच्छांमध्ये...
काही स्त्रिया असतात...
जणू वाऱ्याची सावली —
अदृश्य, पण स्पर्शून जाणारी,
हृदयाला भिडणारी,
मौनात बरंच काही सांगणारी...
वेडावतात अनाहूत प्रेमात,
जिथे त्यांचं स्वतःचं काही राहत नाही,
फक्त दुसऱ्यामध्ये मिसळतात स्वतःचं अस्तित्व,
त्यांच्या ओठांवर असतं एखाद्याचं नाव,
अन् डोळ्यांत — एक अबोल प्रार्थना...
काही स्त्रिया
रोज उगवतात
दैनंदिन सूर्याच्या आधी,
पण अस्त मात्र होतो
चंद्राच्या कोणत्यातरी प्रहरात —
शांत, शांत...
त्या बोलतात नाहीत,
पण त्यांच्या अबोलपणात असतं
एक संपूर्ण जग...
जे समजण्यासाठी ऐकावं लागतं —
फक्त हृदयानं...
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २६/०४/२०२५ वेळ : ०२:२९
Post a Comment