कविता - कवितेचा प्रवास

कविता - कवितेचा प्रवास
 
शब्दांच्या सरींनी भिजत,
लेखणीचा ओलावा टिपत, 
भावनांचे तळ गाठत, 
कविता जन्म घेते...
 
कधी कस्तुरी गंधासारखी, 
हळवी, मऊ, मोरपीसासारखी, 
तर कधी ज्वालाग्राही ठिणगी, 
जणू अन्यायासमोर सतत उभी...
 
हातात तुळशीपत्र ठेवून, 
ती गाते वेदनेला, 
कधी स्वप्नांना लाथ मारून, 
भिडते आशेच्या सागराला...
 
मनामनांत घर करत, 
प्रत्येक हृदयाचा ठाव घेत, 
प्रेम, विरह, आसक्तीने, 
कविता वाहत राहते सतत...
 
ना तिला साज हवा, ना वाद्य, 
ना रंग, ना चौकट, 
मुक्त असते तिचे आकाश, 
अनंतातही तिचीच गाणी गात...
 
ती तुझी, माझी, साऱ्यांची, 
शब्दांच्या पल्याड पोहोचणारी, 
भावनांना अर्थ देणारी, 
जगण्याला श्वास देणारी...
 
कधी असते ती सत्याचा सूर, 
कधी करुणेचा ओलावा, 
कधी काळजाचा टाहो, 
तर कधी लढ्याचा हुंकार...
 
उन्हापावसात भिजत, 
वाऱ्याच्या तालावर हेलकावत, 
पानोपानी उमटत, 
प्रत्येक जीवाशी नाते सांगते...
 
एक दिवस हरवतील चेहरे, 
काळाच्या वाटेवर विरतील आठवणी, 
पण कविता? ती राहील अबाधित, 
पिढ्यान् पिढ्या वाहत राहील, 
अक्षरांच्या सोनेरी झर्‍यासारखी!

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २१/०३/२०२५ वेळ : ११:२०

Post a Comment

Previous Post Next Post