कविता - एकरूप

कविता - एकरूप

भेटत असता सागर-सरिता,
मीठात साखर विरघळत जाते,
स्वत्व विसरुनी, तत्वात त्याच्या,
लाटांसवे अलवार झुलत रहाते.

तो अथांग, तो गंभीर,
ती मंदस्मित लेवून धावे,
एकमेकांत विलीन होता,
स्वतःस विसरून मिसळून जावे.

स्पर्श जरी झाला, तरीही न लाजते,
येई हळवी सरिता सागरतीरी,
स्वप्नांतल्या प्रियकरास साद घालत,
ओढ दाटे मिलनाची अंतरी.

साखरसंस्कार हृदयाशी ठेवून,
सागरच्या मिठीत हळूच शिरते,
गोड-खारट चव मिसळता,
प्रेमगीत नव्याने नभात झंकारते.

क्षितिजाशी गूज गुंफून जाते,
स्वरमिलनात सूर मिसळते,
लाटांत स्वतःला हरवून जाता,
गूढ नात्यात रममाण होते.

मंद गंध हृदयी दरवळता,
त्याच्या मिठीत ती विरघळते,
हळूहळू त्याच्यात विलीन होता,
एकरूप होऊन अखंड नांदते!

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २०/०३/२०२५ वेळ : ०५:३१

Post a Comment

Previous Post Next Post