कविता - थेंब थेंब जपूया

कविता - थेंब-थेंब जपूया

थेंब-थेंब जपला असता,
तर माळरानावर हिरवाई फुलली असती,
कोरड्या नद्या पुन्हा प्रवाही झाल्या असत्या,
आणि विहिरींना खोल तळ गाठावा लागला नसता!


पावसाच्या थेंबांना ओंजळीत घेत,
आभाळाने गाणं गायलं असतं,
आज मात्र भेगा पडलेल्या जमिनीसह,
नद्या शोध घेत आहेत स्वतःच्या अस्तित्वाचा!


शहरातली गळती थांबवली असती,
तर लाखो ओठ पाण्याने भिजले असते.
नद्या वाहत राहिल्या असत्या,
आणि शेतीने घेतला असता हिरवा श्वास!


कधी विचारलंत का स्वतःला
ब्रश करताना वाहणारं पाणी,
एखाद्या तहानलेल्या जीवासाठी जीवन असू शकतं?
गाड्या धुताना वाहून जाणारं पाणी,
शेतकऱ्याच्या शेताला संजीवनी देऊ शकतं?
पाणी आहे, म्हणून आपण आहोत,
त्याचा अपव्यय म्हणजे आपल्या भविष्याचा विनाश!


विनासायास लाभलेल्या ह्या वरदानाचा
आपणच गैरवापर करतोय,
आणि उन्हाळ्यात 

त्याच्या प्रत्येक थेंबासाठी तडफडतोय!


भान ठेवा!
निसर्गाच्या देणगीचा सन्मान करा,
थेंब-थेंब जपूया,
झरे जिवंत ठेवू या.
उद्याच्या पिढ्यांसाठी
थेंब-थेंब साठवूया,
नाहीतर… 

भविष्याच्या रखरखीत वाळवंटात
पाण्याच्या थेंबासाठी दान मागत फिरावं लागेल!

पाणी वाचवा, जीवन वाचवा!


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : २२/०३/२०२५ वेळ : ०४:०९

Post a Comment

Previous Post Next Post