कविता - ग्रेस... शब्दांचा गर्भितार्थ

सुवर्णक्षण 
१०.५.२०२३

आज कवी ग्रेस यांचा जन्मदिन
जन्म १० मे १९३७
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस! 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या विलक्षण हळव्या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस सर!

सर गेल्यानंतर त्यांच्या शोकसभेत अनेक मान्यवरांना ऐकलं. त्यानतर सुचलेलं काव्य आज सरांनाच समर्पित करत आहे. 



कवी जातो तेंव्हा....

कवी जातो तेव्हा....
खरंतर कोणालाच 
काहीच फरक पडत नाही
चार दोन वर्तमानपत्रांमध्ये 
येतात कोणत्यातरी कोपर्‍यांमध्ये
त्याच्या जाण्याच्या बातम्या
कोणीतरी ठेवतं 
एखादी शोकसभा
काही प्रस्थापित 
बोलतात त्याच्याविषयी 
चांगलं चांगलं
आणि पुन्हा सगळे
आपआपल्या दिशेने
हो मान्यच आहे
त्यांचं ते वागणं
कारण, जन्माला आलेला प्रत्येकजण 
मरणार आहे 
प्रत्येकाच्या जाणिवेच्या कक्षांची 
खोली वाढू लागली की 
अंताकडे जाण्याची 
अटळ दिशा त्याला खुणावू लागते
आणि केवळ होतो अंत
त्याच्या शरीराचा
त्याच्या कवितांची शीर्षके 
त्याच्या पडझडीची 
आजही देतात साक्ष
त्याच्या कवितेतून 
प्रतीत होणाऱ्या संकल्पना 
आणि शब्द म्हणजे 
मृत्यूचीच सौम्य पण दाहक रुपं
त्या शब्दांच्या पोटात दडलेले
क्षणभंगुरतेचे ध्वनी आणि 
अंत:काळची दाट छाया 
त्यामुळे कवितेवर पसरलेले
दाट काळे रंग झालेत 
अधोरेखित 
आणि तो जिवंत असताना
त्याच्या त्याच कवितांना
समिक्षक लावत होते
निष्कर्ष फुटपट्ट्या 
त्यानं आशावादी असावं, 
तिमिरातून तेजाकडे नेणारी 
त्याची दृष्टी असावी, 
मृत्यूवर मात करत त्यानं
जीवन सन्मुख असावं, 
विरक्त फुलपाखरातून 
आसक्ती निर्माण करावी 
रात्रीच्या गर्भात 
उद्याचा उषःकाल दाखवावा
आणि आता त्याच दुर्बोध 
कवीचे आणि कवितांचे
ते करताहेत 
कौतुक, सोहळे, पुरस्कार 
अग्नीच्या स्वाधीन होऊन
त्याची राखही
थंडगार झाल्यावर
विसर्जित झाल्यावर
आता त्यांना खुणावतोय
त्याचातला सच्चेपणा 
कवी जातो तेंव्हा....
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
मुंबई, महाराष्ट्र 

Post a Comment

Previous Post Next Post