कविता - अस्ताची वाट
संधिप्रकाशात रंगांची आरास खुलते
क्षितिजाकाठी दिवस हळुवार विरतो
निरोपाच्या सुरांना मंद गंध लाभतो
मावळतीचा क्षणही शांततेत विलसतो
जीवनाच्या वाटेवर निवांत क्षणी
मंदावलेल्या श्वासांशी मन संवाद साधतं
अनुभवकिरणांनी अंतरंग उजळून निघतं
आठवणींची ऊब शांतपणे साचून राहते
उंबरठ्याशी वेळ हळुवार कुजबुजते
पाऊलखुणा गतकाळ उलगडतात
यशअपयशातून व्यक्तिमत्त्व घडतं
प्रत्येक ठेच नवी उंची देऊन जातं
अस्त कधीच हरपणं नसतं हे खरे
पहाटेच्या बीजांतून जीवन बहरतं
निःशब्दतेतून प्रकाश डोकावतो
समाप्तीमधून नवा आरंभ होतो
अस्तित्वाचा अर्थ जपणं हा खरा वारसा
मानवी स्पर्शातून उमटतो नवा ठसा
क्षणभंगुरतेत शाश्वत दीप प्रज्वलित होतो
साधेपणातून जीवनार्थ सहज उलगडतो
अस्ताच्या क्षणी सुवास दरवळतो
हास्यरेषांनी चेहरा हलकेच उजळतो
कृतज्ञतेची झुळूक अंतरी शांत नांदते
दृष्टीसमोर सागर अलवार दाटतो
अंतिम क्षणी देण्याची वृत्ती बहरते
वेदनेतून करुणेची कळी फुलते
स्मितकिरणांनी अंधार विरघळतो
निर्गमनातही सौंदर्य ठसा उमटवतो
सूर्य मावळताना नभ रंगवून जातो
तसंच आयुष्य अर्थ देत पुढे सरकतं
शेवटच्या श्वासात दीप तेवत राहतो
अन् अस्ताची वाट विलोभनीय करतो
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २६/०३/२०२६ वेळ : ०९:५४
Post a Comment