कविता – कृतघ्न
जन्मताना
मी काहीच आणलं नव्हतं...
तरीही
कुणीतरी
माझ्यासाठी
स्वतःचं आयुष्य
पणाला लावलं.
माझ्या भुकेसाठी
त्याने
स्वतःच्या अनेक रात्री
उपाशीच
मावळू दिल्या
माझ्या उद्यासाठी
त्याने
त्याचे आज
शांतपणे खर्च केले.
मी वाढत गेलो...
आणि
त्याच्या आयुष्यातील
एकेक ऋतू
गळत गेला.
मी यशाच्या शिखरावर
उभा राहिलो तेव्हा,
खाली दिसायला हवं होतं
त्याचं माणूसपण...
पण
मला दिसला
फक्त
माझाच अहंकार.
कृतघ्नता
एका दिवसात जन्म घेत नाही.
ती
कोणी आपल्यासाठी
करत असलेल्या
गोष्टींवर आपला
हक्क समजण्यापासून
सुरू होते.
आणि मग—
आभाराचे शब्द
ओठांवरून हरवतात,
आणि
नाती
मनातून.
झाड
मुळांना विसरत नाही,
म्हणूनच
वादळानंतरही
ते पुन्हा हिरवं होतं.
माणूस मात्र
मुळांनाच विसरतो...
आणि
आयुष्यभर
हिरव्या पानांचा
अभिमान बाळगत,
आतून
कोरडाच राहतो.
कृतघ्न माणूस
इतरांचं काहीच
हिरावून घेत नाही
तो
स्वतःच्या मनातली
कृतज्ञतेची विहीर
आटवून टाकतो.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ०२/०८/२०२६ वेळ: ०३:१५
Post a Comment