कोणत्याही आईला फक्त हेच हवे असते की तिच्या मुलींना सणांच्या दिवशी प्रेम, आपुलकी आणि आदर मिळावा, अशीच एक नातेसंबंध जपणारी लघुकथा.
"आई, इतक्या सकाळी तुम्ही स्वयंपाकघरात काय करताय?" देशी तुपाच्या सुगंधाने जाग आलेल्या सियाने शयनगृहातून बाहेर येता-येता तिच्या सासूला दामिनीला विचारले.
'सिया... ते... संक्रांत आहे ना म्हणून मी शोभा आणि प्राचीला द्यायला लाडू बनवत होते.' सासूबाईंनी सांगितले.
'आई, तुम्हांला माहिती आहे का, आजकाल देशी तूप किती महाग झालंय...? असो मिहिर नेहमीच बाजारातून मिठाई दोघींच्याही घरी नेहमी देत असतो. तुम्ही आता नवीन रित चालू करू नका, मला भविष्यात असं करता येणार नाही. सण अधूनमधून येत राहतात, जर तुम्ही असेच दररोज काहीनाकाही बनवत बसलात तर घरचा खर्च कसा भागवायचा? सियाने तणतणत म्हटले.
सुनेचे बोलणे ऐकल्यानंतर दामिनीचे हात तिथेच थांबले. जणू काही त्यांच्या हातात जीवच नव्हता असे वाटत होते. घरचा खर्च कसा भागवायचा हे त्यांनाही माहित होते, पण आज त्यांना खूप असहाय्य वाटत होते. त्यांनी विचार केला, कदाचित सूनेचं बरोबर आहे. नवऱ्याच्या जाण्यानंतर, मुलगा सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आहे. सुनेलाही हिशेब ठेवण्याचा अधिकार आहे.
दामिनीजींनीही खूप कष्टाने आपल्या मुलांना वाढवले. त्यांना दोन मुली आणि एका मुलगा होता. उत्पन्न कमी असतानाही, त्यांनी कधीही आपल्या मुलांना निराश केले नाही. त्या काळात बाहेरून घरी अन्नपदार्थ क्वचितच येत असत, त्यामुळे दामिनी घरी प्रत्येकाच्या आवडीनुसार काहीतरी तयार करत असत. हळूहळू आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होत होती. मुलाने मिहिरनेही आता शिक्षण पूर्ण केले होते आणि तो काम करू लागला होता. घरखर्चासह बचतही होऊ लागली. मुलांची लग्नही चांगल्याप्रकारे झाली. प्रत्येकजण आपापल्या कुटुंबात आनंदी होता. बरीच वर्षे सगळं व्यवस्थित चाललं होतं, अन् अचानक दामिनीचा नवरा तिला कायमचा सोडून गेला. त्यांच्या जाण्यानंतर, दामिनी आता तिच्या मुलांच्या आधारावर तिचे आयुष्य जगत होती. त्यांनी कधीही आपल्या इच्छांचे ओझे आपल्या मुलावर आणि सुनेवर लादले नाही, परंतु सासऱ्यांच्या जाण्यानंतर, सियाच्या नजरेत दामिनीजी फक्त घरात ठेवलेल्या वस्तूसारख्या झाल्या होत्या, ज्यांना घरात एक स्थान आहे, पण अधिकार नाहीत.
दामिनी झाल्या प्रकारावर काहीही न बोलता स्वयंपाकघरातून बाहेर पडल्या. एक आई नेहमीच तिच्या मुलींच्या आवडीनिवडी लक्षात ठेवते, म्हणूनच आज ती तिच्या मुलींसाठी लाडू बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली होती. डोळ्यातून अश्रू आले नाहीत, पण मन खूप दुखावले गेले. सिया कटकट करत स्वयंपाकघरात आली आणि तिने पाहिले की बेसन तुपात भाजलेले आहे. तिने लाडू बांधले, एका डब्यात भरले आणि वर ठेवले.
चार दिवसांनी, सियाने तिच्या आईला फोन केला, 'आई, विनय सणाची भेट घेऊन कधी येणार आहे?' सियाने तिच्या आईला विचारले.
'सिया बेटा, तुझा भाऊ जरा कामात आहे. त्याला आता वेळ नाहीये. दोन-चार दिवसांत त्याला वेळ मिळाला की तो येइल." आई म्हणाली.
'आई, यावेळी तू बनवलेली खीर मला पाठव. तू बनवलेली खीर खाऊन खूप दिवस झाले.' सिया अस्वस्थ होत म्हणाली.
'ठीक आहे बेटा, मी बघते..' असं म्हणत सियाच्या आईने फोन ठेवला.
दोन दिवसांनी सियाचा भाऊ विनय आला. एका बॅगेत काही सामान होते, ते त्याने सियाला दिले आणि म्हणाला, 'सिया, मला घाई आहे. आजकाल मला कुठेही जायला वेळ मिळत नाही. आईने वारंवार सांगितल्यामुळे मला यावं लागलं.'
'विनय, थोडा वेळ बस, मिहिर ऑफिसमधून आता येतील, त्यांना भेट आणि मग जा.' सिया म्हणाली. 'नाही सिया, मी त्यांना पुन्हा कधीतरी भेटेन.' असं म्हणत विनय निघून गेला.
सियाने बॅग उघडली आणि त्यात साडी आणि मिठाईचा डबा असल्याचे पाहिले. सियाने तिच्या आईला बनवायला सांगितलेला खीरीचा डब्बा त्यात नव्हता. सियाने तिच्या आईला फोन केला, 'आई, तू खीर बनवायला विसरलीस का?'
'सिया... मी तुझ्या वहिनीला सांगितले होते की विनयला खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणायला सांग... पण...'
'पण काय आई?' सियाने विचारले.
'ती म्हणाली, तुम्ही आयुष्यभर तुमच्या मुलीलाच देत राहाल का? तुम्हाला माहिती आहे का सुका मेवा किती महाग झाला आहे? हे सांगत असताना सियाच्या आईचा आवाज रुद्ध झाला.
आईचे बोलणे ऐकून सियाचे कानही सुन्न झाले. तिने तिच्या सासूला सांगितलेले शब्द तिच्या मनात घुमू लागले, 'तुम्हाला माहिती आहे का देशी तूप किती महाग झाले आहे?'
सियाने थरथरत्या हातांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मिहिर त्याच्या बहिणी शोभा आणि प्राचीच्या घरी जाण्यासाठी निघत होता, तेव्हा सियाने दोन डब्ब्यांमध्ये लाडू भरले. दामिनीने सियाकडे पाहिले तेव्हा तिची नजर शरमेने खाली झुकली, अन् ती मिहिरला म्हणाली, 'दीदींना सांगा की आईने लाडू पाठवले आहेत.'
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १४/०१/२०१९ वेळ : ०६:०३
Post a Comment