सुवर्णक्षण
१३.१०.२०२३
मिशन रानीगंज' हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे ज्यामध्ये अक्षय कुमार जसवंत सिंग गिल नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले आहे. परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. लग्नानंतरचा हा तिचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. "मिशन रानीगंज" ही कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्याची कहाणी आहे.
साधारण २२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'लगान' हा चित्रपट आठवत असेल, तर त्याच्या कथेचा मूळ घटक असा होता की, कठीण प्रसंगासमोर वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन आलेल्या आपत्तीचे विजयात रूपांतर कसे करतात. "मिशन रानीगंज" या चित्रपटात जीवन संघर्षाची अशी कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय प्रेक्षकांना जगण्यासाठी संयम, साहस आणि संकल्पाची एक साखळी तयार करतात. त्यांच्यासमोरच्या पराभवाचे त्यांच्या इच्छेने विजयात रूपांतर करण्याची धडपड याच्याशी जोडण्याचाही हा चित्रपट चांगला प्रयत्न आहे. 'रुस्तम' चित्रपटाच्या सात वर्षानंतर दिग्दर्शनाकडे पुनरागमन केलेले दिग्दर्शक टिनू देसाई यांनी २ तास १४ मिनिटांचा बनवलेला हा चित्रपट प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.
"मिशन रानीगंज" ही जसवंतसिंग गिलची कथा आहे. ज्यांनी आपल्या संयम, साहस, संकल्प आणि चतुराईने कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांना वाचवले. चित्रपट आपला कालखंड स्थापित करण्यासाठी क्लासिक दूरदर्शन मालिका 'महाभारत' ची मदत घेतो आणि सुरुवातीच्या नृत्य आणि गाण्यानंतर थोडा उशीरा मुद्द्यावर येतो. सुरुवातीला जसवंतसिंग गिल यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. पण खाणीच्या स्थानिक व्यवस्थापनाला त्यांच्यामध्ये आशा दिसते. पारंपारिक तंत्राव्यतिरिक्त इतर प्रयोग करण्यात त्याला मदत करणाऱ्या तंत्रज्ञाच्या मदतीने एक आणि एक अकरा होतात. काम सुरू होते. व्यावसायिक शत्रुत्व असलेल्या काही लोकांना हे मिशन कोणत्याही प्रकारे यशस्वी होऊ नये असे वाटते. अडथळे उभे केले जातात, षड्यंत्र रचली जातात, परंतु ज्याचा शेवट चांगला होतो ते सगळंच चांगलं असतं.
सलग अर्धा डझन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर, अभिनेता अक्षय कुमारचे नशीब त्याच्या मागील 'ओएमजी-२' चित्रपटाने बदलले आहे, जरी त्या चित्रपटाच्या यशाचे बहुतेक श्रेय त्याचे दोन प्रमुख कलाकार पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांना जाते. 'मिशन रानीगंज' हा अक्षय कुमारचा एकल चित्रपट आहे. आजकाल तो एकल चित्रपट करणे टाळत असला आणि असे चित्रपट करत आहे ज्यात चित्रपट यशस्वी होण्याची जबाबदारी त्याच्यासह इतर काही प्रमुख कलाकारांनी पार पाडली आहे, परंतु अनपेक्षितपणे हा चित्रपट एक चांगला चित्रपट ठरला आहे आणि यामध्ये अक्षय कुमारने सरदाराची भूमिका साकारली आहे. त्याची पत्नी गरोदर असताना, तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची तारीख असूनही गिल जेव्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी मैदानात येतो तेव्हा प्रेक्षक आपोआपच त्या पात्राबद्दल सहानुभूती बाळगू लागतात. अक्षयनेही नेहमीच्या गोष्टी बाजूला ठेवून इथे गांभीर्याने अभिनय केला आहे आणि शेवटपर्यंत चित्रपटावर नियंत्रण ठेवले आहे.
टिनू सुरेश यांनी हा तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा चित्रपट अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खाणीत अडकलेल्या कामगारांच्या दुरावस्थेचे त्यांनी गंभीर चित्रण केले आहे. कॅप्सूल तयार करतानाची एक झलक दाखवतात, परंतु त्याच्या खोलीत जात नाहीत. कामगार खाणीत अडकल्यापासून ते बाहेर येईपर्यंत तणावाचे वातावरण कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. आशुतोष गोवारीकरच्या 'लगान' चित्रपटाप्रमाणेच दिग्दर्शक देसाई यांनीही कथा पुढे नेण्यासाठी सहाय्यक कलाकारांची मोठी फौज सोबत घेतली आहे आणि, त्यांना यात खूप मदतही मिळते. विशेषत: उज्ज्वलच्या भूमिकेत कुमुद मिश्रा, पाशूच्या भूमिकेत जमील खान, भोलाच्या भूमिकेत रवी किशन आणि जुगाड तंत्रज्ञ म्हणून पवन मल्होत्रा यांनी चित्रपटात कौतुकास्पद काम केले आहे. बच्चन पचेरा, सुधीर पांडे, मुकेश भट्ट आणि ओंकार दास माणिकपुरी यांसारख्या ओळखीच्या चेहऱ्यांची उपस्थितीही चित्रपटाचा तणाव टिकवून ठेवण्यास मदत करते. दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा आणि शिशिर शर्मा यांनी चित्रपटाचे गडद रंग हाताळले आहेत. चित्रपटातील फक्त दोन गाणी आणि चार-पाच दृश्यांसाठी परिणिती चोप्रा जबाबदार आहे, पण तरीही तिची उपस्थिती चित्रपटाला भावनिक वळण देण्यास मदत करते.
चित्रपटाचे संगीत मधुर आहे, ऐकायला छान वाटते. विशेषत: सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'जलसा' आणि विशाल मिश्रा यांच्या 'किमती' ही गाणी तुम्हांला त्याचे बोल गुणगुणायला भाग पाडतील.
आपल्या आजूबाजूला असे अनेक नायक आहेत, ज्यांच्याबद्दल आपण कधीच ऐकले नाही. हा चित्रपट अशाच एका शूर वीराची कथा आहे. संयम, साहस आणि संकल्पाचं प्रतिक असलेला "मिशन रानीगंज" हा चित्रपट एकदा बघायलाच हवा. तुम्ही अक्षय कुमारचे चाहते असाल किंवा नसाल तरी हा चित्रपट तुमच्यासाठी आहे.
मिशन रानीगंज
कलाकार : अक्षय कुमार, कुमुद मिश्रा, पवन मल्होत्रा, वरुण बडोला, दिब्येंदु भट्टाचार्य, राजेश शर्मा, वीरेंद्र सक्सेना, अनंत महादेवन, जमील खान, सुधीर पांडे, रवी किशन आणि परिणीती चोप्रा
लेखक : विपुल के. रावल, दीपक किंगरानी आणि पूनम गिल
दिग्दर्शक : टीनू सुरेश देसाई
निर्माता : वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जैकी भगनानी आणि अजय कपूर
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : १०/१०/२०२३ वेळ ०४:०७
Post a Comment