लघुकथा
सुवर्णक्षण
११.९.२०२३
गर्भधारणा
दहा वर्षे एकत्र राहिल्यानंतर, एके दिवशी अनुपमा अनूपला म्हणाली, “मी तुझ्या मुलाची आई होणार आहे." अनूपचा उदास चेहरा पाहून ती म्हणाली, "तू बाप होणार आहेस याचा तुला आनंद झाला पाहिजे." तरीसुद्धा त्याचा उदास चेहरा पाहून ती चिडवत म्हणाली, "काय आहे अनुप? तुला खर्चाची काळजी वाटतेय का? काही काळजी करू नकोस. तसंही तू माझ्यापेक्षा कमी कमावतोस. म्हणून बाळाचा खर्चही मी एकटीच उचलणार. चल आता तरी आनंद व्यक्त कर."
अनुपने एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाला, "खर्चाची गोष्ट नाही, प्रिये! मला मुले असलेल्या स्त्रिया आवडत नाहीत. जर तू गर्भपात केला नाहीस तर मला तुझ्यापासून नाइलाजाने वेगळे व्हावे लागेल." "काय!" अनुपमा उद्गारली. "अनूप, मी तयारी केली आहे." असे म्हणत ती शयनगृहात गेली. आपलं गरजेचं सामान ब्रीफकेसमध्ये भरलं आणि बाहेर आली. घराबाहेर निघताना ती म्हणाली, "मी अजून प्रेग्नंट नाही. मला तुझं प्रेम जाणून घ्यायचं होतं, पण ते तू फक्त स्वतःवर करतोस." असं म्हणत ती वेगाने घराबाहेर गेली आणि अनुप मात्र मोबाइलवर काहीतरी करत पाठमोरा बसला होता.
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : १०/०९/२०२३ वेळ : ०५:३९
Post a Comment